10 March 2007

मी शब्दांचा बहर आणलाय - सनिल पांगे

मी शब्दांचा बहर आणलाय
काव्याची मैफिल जमलीय समजून
करुन दिला असता माझा परिचय,
पण कुठे ओळखलंय मी मला अजून

खरं तर माझी खरी ओळख
माझ्या काव्यातून उलगडेल
एखादं नाजूक मोरपिस अलगद
तुमच्या रसिक मनावर बागडेल
स्पर्श त्याचा असा अनुभवालं
जो कधीच बोचणार नाही
बोचलाच, तरी चुकनही
वेदना मनापर्यंत पोचणार नाही

म्हणुनच भावनांच्या असंख्य चांदण्यांची
तूमच्यासाठी खास माळ विणली आहे
आणि कवितांची काही फुले नाही
मी अख्खी बागचं आणली आहे

एक विनंती

तुमच्या कवि मनाशी जुळेल असा
नाजुक बंधनाचा धागा द्या
जास्त नाही मनाच्या कोपऱ्यातचं
पण आपुलकीनं थोडी जागा द्या

तसंमाझ्या नजरेतून न्याहाळा
प्रेमाचं विश्व किती सुंदर आहे
फुलांची तशी सारेच कदर करतात
पण इथे काट्यांचाही आदर आहे

खरं तरमाझ्याही जिवनात उजेड आहे
कधी अंधार उजेडाला पुसत नाही
पण धुकं इतकं पसरलय,
शेवटी काहीचं दिसत नाही

शेवटी

असं काय मी आणंल इथे
जे इथलं मी घेऊन जाणार आहे
पण कविताच्या बिजातून तुमच्या मनात
पुन्हा पुन्हा जन्माला येणार आहे

आणि जाता जाता

वाटतं जोपर्यंत जगीन, तोपर्यंत
कोणाचाच माझ्यावर आरोप नसावा
फक्त कवितांची विभूती मागे ठेवून
उदबत्ती सारखा निरोप असावा

जरी गेलो तुमच्यातून कधी
तरी तुमच्यातचं असणार मी
खळी पडून गालावर
अलगद पसरणार मी

- सनिल पांगे

तुम्ही विद्वान असून


मी कुठे पत्ते उघडले अजून
मी तर "ब्लाईंड" गेम खेळतोय
चाल खेळण्या आधीचा
मी तो "माईंड गेम" खेळतोय

मी कुठे पत्ते उघडले अजून
आजवर फक्त आत्मविश्वास मानले
मी तर नोटांच्या बंडला घेऊन आलो
अरे..रे तुम्ही फक्त सुट्टे आणले?

मी कुठे पत्ते उघडले अजून
तरी माझ्या विरुद्ध सारेचं कसे
मी अज्ञान, मुर्ख, वेडा, अढाणी
तुम्ही विद्वान असून कोरेचं कसे

मी कुठे पत्ते उघडले अजून
आणि ते पिसलेही मी कधी होते
मग पत्ता टाकताना तुमची नजर
आपाआपसात का खाते गोते

मी कुठे पत्ते उघडले अजून
तीन बादशाह, म्हणून सुखावलात का
९९९% तुमचाचं विजय, पण
मिळवण्या आधीच लडखडलात का

उघडतोय मी पत्ते आता, पण
"पॅक" करून तुम्ही डाव सोडता का
दोन-तीन-पाच माझ्याकडे पाहून
एकमेकांची डोकी फोडता का?

सारांशपत्ते असो वा जिवन
विजयी टिळकं त्याच कपाळी लावता
तजे पराभवाच्या खोल पोकळीतूनही
संधी मिळताच बाजी पलटवतात

@सनिल पांगे

तुझ्या विषयी काही वाटताना


वाटतं सुखानेही तुझ्याकडे धाव घेताना
अचानक होणारा स्पर्श जाणावा
चुकून डोळ्यांतून अश्रु ओघाळला
तर आधी शिंपला शोधून आणावा

वाटतं तुझ्या आयुष्याच्या वाटेवर
सर्वत्र पसरली मखमल असावी
चुकून एखादा काटा कधी रुतला
तरी वेदना फुलांहून कोमल असावी

वाटतं देवानेही तुझ्यासाठी
नवस न बोलता पावावं
तू हाक मारण्याआधीचं
स्वःखुशीने तुझ्याकडे धावावं

वाटतं सासरी तू पाऊल ठेवताच
सासूच्या रूपात तुला आई लाभावी
ती तुझी आई पेक्षा, तू
तिची मुलगी शोभावीसतसं

खूप वाटतं तुझ्याविषयी
पण हा कागद म्हणून बरं आहे
आणि तूझं ऐंकायचं झालं तर
तुझं अखंड आयुष्य अपूरं आहे

*******सनिल पांगे.

कोणिच नसेल साथ जेव्हा


कोणिच नसेल साथ जेव्हा
सावलीही सोबत येत नसे
तेव्हांच काळोखाला भेदत
किरणाची तिरीप येत असे

कोणिच नसेल साथ जेव्हा
हातही, हातास अस्प्रुश्य भासती
तेव्हाचं एखादे निस्वा:र्थी मन
थरथरणाऱ्या ओठांनी हात चुंबती

कोणिच नसेल साथ जेव्हा
आपलीच माणसं आपणास नकारी
तेव्हांचं दूर कुठून तरी
अनोळखी अंतरीचे सूर पुकारी

कोणिच नसेल साथ जेव्हां
भाग्यही आपल्यावर रुसती
तेव्हांच एखादं कलंकीत भाग्य
आपल्या ग्रहांच्या संगतीत बसती

कोणिचं नसेल साथ जेव्हां
साऱ्यांनी आपणास ठरवून टाळावं
तेव्हां अंतरमनाला हाक देऊन
आत्मास भरभरून कुरवाळून घ्यावं


@सनिल पांगे

स्पर्श न कळला मला


प्रेत्येक पुस्तकाचं मी, मधलं पान होतो
सारेचं चिडवी मला, मी किती छान होतो

उपभोग माझा झाला, पडणाऱ्या हातात असा
उपटवून मुळातून मला, मी इतका महान होतो

नको दोष देऊस तू, उगाचचं तुझ्या यौवनाला
स्पर्श न कळला मला, मी इतका अज्ञान होतो

का सजवता मला वेड्यांनो, त्या सरणावर असे
नका जाळू तिथे मला, जिथे मीच स्मशान होतो

झेलला भार वीर सैन्यांचा, हत्तींचा, न घोड्यांचा
मिरवलो कधी रणभूमी म्हणून, आज ओसाड मैदान होतो

@सनिल पांगे

मी केंद्रबिंदू


ना मी पूर्वेचा, ना पच्छिमेचा
माझा प्रवास दाही दीशेचा
ना मी उत्तरेचा, ना दक्षिणेचा
मी केंद्रबिंदू आकाशगंगेचा

ना मी धरतीचा, ना आभाळाचा
मी चुंबन त्या क्षतिजरेषाचा
ना मी गर्भातला,ना मी सरणावरचा
मी आत्मा शरिरातल्या गणवेशाचा

ना मी भावनांचा, ना मी विचारांचा
मी खेळ खंडोबा तुमच्या कल्पनांचा
ना मी आजचा, ना मी कालचा
मी एक दुवा हरेक काळांचा

ना मी आशेचा, ना मी निराशेचा
मी तर भोग तुमच्या कर्माचा
ना मी ह्या जातीचा, ना त्या जमातीचा
मी तर इतिहास मनुष्य धर्माचा

ना मी भरतीचा, ना आहोटीचा
मी शांतता सागराच्या खोल पातळीतली
ना मी आगीचा, ना मी धूरांचा
मी ज्वालामुखी पृथ्वीच्या पोटातली

ना मी अमका, ना मी तमका
मी तर श्वास प्रत्येक मनांचा
ना मी चंद्राचा, ना मी चांदण्यांचा
मी जगतो ते भारवलेल्या क्षणांचा

सनिल

मी बोलका पुतळा


मी कोण हा इथे
लाका प्राण इथे रुतला
दगड केला साऱ्यांनी
मी बोलका पुतळा

ना मी भाव कवितेतला
ना गझलेतला मतला
मी अडथळा शब्दातला
मी अर्थहीन पुतळा

न सूर तो मी आतला
ना नूर मी संगीतातला
आवाज कर्कश कंठातला
मी बेसूर पुतळा

तो स्पर्श कसा बाजारातला
हा जन्म कसा पापातला
मी प्रश्न सुज्ञान समाजातला
मी बेवारशी पुतळा

तो कोण असा भेटला
का घाव उरी घातला
मी श्वास उसना घेतला
मी कर्जबाजारी पुतळा

ना ओळखले मी तुजला
ना ओळखले तू मजला
अंकूर नासलं प्रेमातलं
मी निरवंशी पुतळा

@सनिल पांगे

जिंकीन जग सारं


जिंकीन जग सारं
मिसळून रंगात रंग
सैतानाच्या मुखातून
वेदून घेईन अभंग

जिंकीन जग सारं
गस्त घालूनी किनारी
रोखीनं उधान सागरास
झेलूनी लाटा प्रहारी

जिंकीन जग सारं
जुंपून ज्वालामुखीशी
गिळून आगीचा गोळा
मी शीत वाहीनं उराशी

जिंकीन जग सारं
मी काळ परतवून
स्थापीन सतयुगास
गीतेचा अर्थ होवून

जिंकीन जग सारं
पण.... हाय ना मी कोणाचा
मी आठवे दु:ख त्यांचे
ते विसरती बहर ऋणांचा

जिंकीन जग सारं
तीळभरही शंका नाही
का गर्व करीशी मना तू
शेवटी जळाली लंका ही

@सनिल पांगे

तू नवा आरंभ झालीस


मी काळोखातच होतो
तू प्रकाश घेऊन आलीस
मी कोंडलचं स्वत:ला आज
वरतू आकाश देऊन गेलीस

मी वृक्ष बोडकं होतो
तू नसानसात पालवी झालीस
ओसाड माझ्या जिवनी
तू बहर घेऊन आलीस

मी चिखलात रुतलेलो
तू जिवनात कमळ झालीस
मी भावना रहित होतो
तू शब्दरुपी वादळ झालीस

जिवन माझं विस्कटलेलं
तू सावण्यासाठी झीज केलीस
निर्धार माझा गळलेला
तू चमकून वीज झालीस

मी वनव्यात जळत होतो
तू श्रावणातला गारवा झालीस
मी वटवागूळ होवून जगलो
तू मुक्त विहारणारा थवा झालीस

मी वाट चुकलो होतो
तू दिपस्तंभ झालीस
मी माघार घेतलीच होती
तू नवा आरंभ झालीस

@सनिल पांगे

जिवनाचा अर्थ उमगलाय


आज का निजले सारे
चंद्र, सूर्य नि बोलके तारे
आज का बोचत नाही
ते कालचे वादळी वारे

आज का ते निळसर आकाश
कालसारखं बरसत नाही
आज का तपत्या वाटेवर
ते चटके सोसत नाही

आज का मनाच्या आरशात
मी मलाच भेटत नाही
आज का एका गुन्हेगाराला
वाल्यासारखं वाटत नाही

आज का मनात कोणतीच
आस जागत नाही
आज का व्यवहारीक सावल्यांच्या
मी मागे लागत नाही

आज का मनाच्या गाभ्यात
एक चिता जळत नाही
आज का देवाच्या चरणी
मनःशाती मिळत राही

आज का मोह, माया मत्सर
यांची मैफील सजत नाही
आज का मनाच्या मंदिरात
कीर्तनाची टाळ वाजत राही

आज बहूदा मला
जिवनाचा अर्थ उमगलाय
आज माझं शरीर
मोक्षाच्या पायाशी बिलगलाय

@सनिल पांगे

मला श्ब्दांची परी भेटते


रोज रात्री स्वप्ना मध्ये
मला श्ब्दांची परी भेटते
तुम्हाला घर बसल्या
कवितांची शिदोरी भेटते

कोणि म्हणतं अमूक कमी
कोणि म्हणतं अमूक जास्त
कोणाला मग मीरची झोंबते
कोणि म्हणतं एकदम मस्त

कोणि म्हणतं जरा अळणी
कोणि म्हणतं जरा तिखट
कोणि म्हणतं फारचं बेचव
तर कोणि फारच आंबट

माझ्या शिदोरीची एकच खासियत
ढेकर येतोच हमखास
पण कितीही अजिर्ण झालं तरी
पोठ दु:खीचा नसतो त्रास

शेवटी स्वीट-डीश ची मागणी
माझ्या शिदोरीत तीही असते
काही मनापासून आनंद घेता
तपण काहींची जीभ भाजते

@सनिल पांगे

मी कसा मग वेगळा


कधी सांगशिल, ह्या जगा
तकोण सर्वगुण संपन्न आहे
आकाशात कधी चंद्रा कडे बघ
त्याचंही गुणांचं घर अपूर्ण आहे.........

पांढऱ्या शुभ्र त्याच्या त्वचेत
कही काळेकुट्ट डाग आहेत
श्रीरामाच्या जिवनी संशयाचा अवगुण
हा त्याच्या नशिभाचा भाग आहे........

मी एक साधा मनुष्य आहे
मी कसा मग वेगळा असणार
माझ्या आयुष्याचा घडा कुठून
गुणांनीच भरला सगळा असणार........

तरीही तुझ्यासाठी सुधरायचं होतं,
पणसंधी देण्याची तुझी तैयारी नव्हती
दर्जा नावाचं मंदिर ऊंच ऊभारलसं,
पणचढावं म्हंटलं तर पायरी नव्हती

*******सनिल पांगे

अंतःकरणी हाहाकार कैसा


माझा हा फसवा चेहरा, आरश्यास स्वीकार कैसा
तिथे मी मलाचं भेटताना, अंतःकरणी हाहाकार कैसा

लावलास जिव्हाळा तू, नी जीवही जाळलास तू
माझ्या चितेवर मग, तुझ्या आसवांचा हार कैसा

ज्यांच्या चरणी अर्पिले, स्वतःस फूल बनूनी
पाकळ्यांस माझ्या मग, त्यांच्या काट्यांचा वार कैसा

पिंजऱ्यात कैद शब्द माझे, भोगती सजा जन्मठेपेची
माझ्या कवितांचा मग, मुखामुखातून प्रचार कैसा

मी गाठलाच होता किनारा, भांडून सागराशी
नौकेस माझ्या मग, किनाऱ्याचाच नकार कैसा

श्वासांवरही ना कधी, माझा अधिकार होता
जगण्यावर माझा मग, हा भडिमार कैसा

जिंकून जग सारे, वाह वाह झाली दाही दिशा
न जिंकता आले तुला, इतका मी सुमार कैसा

प्राण पणास लावून, जिंकलो मी झुंझार वृत्तीने
त्यांच्या पराजयाचा मग, मी शिल्पकार कैसा

बांधला आपुलकीचा सेतू, भेटणाऱ्या प्रत्येकाशी
त्यांच्या गळ्यात मग, द्वेषाचा अलंकार कैसा

ऐकून होतो, चढ उतार, आयुष्याच्या दोन बाजू
माझ्या वाट्याला मग, नेहमीच उतार कैसा

सनिल पांगे

कोणिच ना हसले,


रडतच आलो जगात जेव्हां
सारे किती हसले होते
जाताना मी एकटाच हसलो
कोणिच ना हसले, ना रुसले होते

अरेरे हे असं कसं झालं
कोणाला काहीचं कसं वाटलं नाही
भावनांचं तळं असं कसं
कुठेच साठलं वा आटलं नाही

नेमकं काय रहस्य दडलेलं
माझ्या जगण्यामध्ये
नेमकं काय कोडं होतं
त्यांच्या तसं वागण्यामध्ये

इतक्यात आत्म्यानं फटकारलं
तुझ्या जाण्यानं न फायदा ना तोटा
कोण कशाला वाया घालवेल
अमूल्य भावनांचा साठा

ना तू कोणाला दु:ख दिलसं
तुझ्या जाण्यानं जो सुखावेल
ना तू कोणाला सुख दिलसं
त्या उपकारास्तव जो दुखावेल

मग का वेडी इच्छा धरतोस
कोणि तुझ्यासाठी अश्रू ढाळावा
तू दु:खही वाटलं नाहीस
एखाद्याला आनंद त्यातून मिळावा

म्हणाला साऱ्यांनी तुझ्यासारखं जगावं
मग कोणताच प्रश्न उरणार नाही
भावनारहीत दगड सागळे, कोणीच
सुख, दु:खाची वाटणी करणार नाही

पटलं मला त्याचं म्हणनं
वाटलं सर्वांनी असचं जिवन जगावं
दोन-चार सुखी जणांखातर
का हजारोनी दु:ख भोगावं

@सनिल पांगे

धागा द्या धागा द्या


धागा द्या धागा द्या
आम्हालाही थोडा धागा द्या
आमच्या शब्दांनाही इथे
व्यासपीटावर जागा द्या

धागा द्या धागा द्या
प्रेत्येकाचं मन म्हणतं
तुमचं नाणं सोन्याचं असलं
तरी आमचं पितळेचंही खणंखणंतं

येऊ द्या येऊ द्या
आम्हालाही पुढे येऊ द्या
चढाओढीच्या खेळा मध्ये
आम्हालाही भाग घेऊ द्या

जिंकू द्या, जिंकू द्या
आम्हालाही मन जिंकू द्या
आमच्या शब्दांनाही थोडाबहूत
कवितेत प्राण फुंकू

द्याऋणानूबंध, ऋणानूबंध
आम्हालाही ऋणी होऊ द्या
तुमचे आभार मनापासून माणून
आम्हालाही कोणि होऊ द्या

मिरवू द्य, मिरवू द्या
आमच्याही कवितेंना मिरवू द्या
आमच्या बावळट मुलांच्या डोईवर
कोणालातरी हात फिरवू द्या

निस्व:र्थ व्हा, निस्व:र्थ व्हा
आमचही घर वसू ध्या
मागच्या बाकावर पडलो आम्ही
कधीतरी पुढे बसू द्या

दान द्या, भिक्षा द्याप्रतिसाद
आम्हाला हकखास द्या
आमच्याही गुदमरत जाणाऱ्या
कवितेनाजगवण्यासाठी एक श्वास द्या.

@सनिल पांगे

तुला शेवटचं जाताना पाहीलं


तुला शेवटचं जाताना पाहीलं
आणि माझे अश्रूं वाहू लागले
तेव्हां पासून ते सातत्याने
पापण्याच्या कूशीत राहू लागले

तेव्हा कळलचं नाही, माझं
पुढचं आयुष्य कसं वाहीलं
पण एका गोष्टीची खात्री होती
अश्रूंचा सागर उसळत राहीलं

अश्रूंनी व्यथा व्यक्त केली जरी
तरी त्यांनीचं खरा आधार दिला
एकेक क्षण जगण्यासाठी
एकेक श्वास उदार दीला

आजवर फक्त कर्जात जगलो
त्यात अश्रूंची भर वाढत राहीली
त्यांच्या परतफेडीच्या चिंतेने
मी रात्ररात्र जागत काढत राहीली

आता भिक्षा मागतोय तुमच्याकडे
मला कर्जातून मुक्त करण्यासाठी
कोणि अश्रूं ढाळेल का माझ्यासाठी
माझ्या अश्रूंच कर्ज उतरवण्यासाठी.

@सनिल पांगे

इतरांच्या मनात स्वैर उरतो


आपलं जगणं म्हणजे
फक्त वस्तु सुख उपभोगनं
कोणी हिरावून घेऊ नये
म्हणून मनात एक दु:ख भोगनं

जमवा जमवी करण्यात
आपण आयुष्याचा वेळ घालवतो
पैसा पैसा जमवून जमवून
आपण एक पीडाच फुलवतो

हातचं कधी सुटून जाऊ नये
म्हणून रक्तांच्या नात्याशीही वैर करतो
जाताना हातचं सुटतचं शेवटी
पण इतरांच्या मनात स्वैर उरतो

माझं चार ओळीत सांगायचं झालं तर
----जमवा जमवी करण्यात
----इथे प्रत्येकजण व्यस्त आहे
----तरीही प्रत्येकाचं जिवन शेवटी
----दुशकाळग्रस्त आहे

@सनिल पांगे

मी तुकडे तुकडे करुन


मी तुकडे तुकडे करुन झोपडी बांधली
त्यांनी डोंगर चिरुन महल बांधला
मी प्रेम वाटून नाती जोपसली
त्यांनी द्वेष पसरवून महल पोखरला
मी हाताला फोड येइस्तव श्रम केले
त्यांनी पळत्याच्या मागे लागून हातचे घालवले
माझ्या घामाचं शांत निद्रेत परिवर्तन झालं
त्यांना झोपही नाही, तरी घर लुटलं
सुर्यकिरणांने माझी झोपडीत प्रकाश वाटला
आलिशान झुंबरातही महलात अंधार दाटला
मी सरी झेलल्या पावसाच्या अंगावरी
त्यांना टब मध्येही उकडतंय भारी
माझ्यामागे पिल्लांना जगण्यासाठी उरलं काही
त्यांची भरमसाठ संपत्तीसाठी वारसचं नाही

@सनिल पांगे

तू राज्य कर मनावर रे


मना स्वत:स सावर रे
तुझा मोह जरा आवर रे
स्वप्नाचा तरंग उठता
का स्वत:स लादशी त्यावर रे

मना स्वत:स सावर रे
मना का नाही ऐकत रे
स्वप्नं ते रुपेरी जरी,
खिशाची नाही ऐपत रे

मना स्वत:स सावर रे
पाय राहूदे जमनीवर रे
मोह, माया सारं सारं
मृगजळ असते वरवर रे

मना स्वत:स सावर रे
स्वत:स घडवं कणखर रे
स्वप्नांनी जरी भुलवलं तरी
आनंद असतो तो क्षणभर रे

मना स्वत:स सावर रे
तू राज्य कर मनावर रे
जिंकून मनं उतर तू
इतिहासाच्या पानावर रे

@सनिल पांगे

कुंपणा बाहेरचं जग


कशाला घरं तू नीटनीटकं सजवलं होतं
कुंपणा बाहेरचं जग चिखलानं बरबटलं होतं

का पाहतेस स्वप्न सुखी संसाराचे
कालचं माझं एकीशी नातं जुळलं होतं

का निरुत्तर पत्र धाडतो मी त्या पत्यावर
तीने तर केव्हांच घर बदललं होतं

का स्वातंत्र्याला मी स्वातंत्र म्हणू इथे
इवल्याश्या फुलांना कालचं कुणी खुडलं होतं

जरा हळू बोल असं साऱ्याने बजावलं मला
मला बजावताना जग किती मोठ्याने किंचाळलं होतं

का जिवापार संभाळ केलास माझ्या हृदयाचा
कालचं मी माझं शरीर भंगारात काढलं होतं

का माझ्यासाठी जमलात तुम्ही स्मशानात वेड्यांनो
जाळण्या पूर्वी किंतींदा तुम्हीचं तर जाळलं होतं

@सनिल पांगे