10 March 2007

कोणिच ना हसले,


रडतच आलो जगात जेव्हां
सारे किती हसले होते
जाताना मी एकटाच हसलो
कोणिच ना हसले, ना रुसले होते

अरेरे हे असं कसं झालं
कोणाला काहीचं कसं वाटलं नाही
भावनांचं तळं असं कसं
कुठेच साठलं वा आटलं नाही

नेमकं काय रहस्य दडलेलं
माझ्या जगण्यामध्ये
नेमकं काय कोडं होतं
त्यांच्या तसं वागण्यामध्ये

इतक्यात आत्म्यानं फटकारलं
तुझ्या जाण्यानं न फायदा ना तोटा
कोण कशाला वाया घालवेल
अमूल्य भावनांचा साठा

ना तू कोणाला दु:ख दिलसं
तुझ्या जाण्यानं जो सुखावेल
ना तू कोणाला सुख दिलसं
त्या उपकारास्तव जो दुखावेल

मग का वेडी इच्छा धरतोस
कोणि तुझ्यासाठी अश्रू ढाळावा
तू दु:खही वाटलं नाहीस
एखाद्याला आनंद त्यातून मिळावा

म्हणाला साऱ्यांनी तुझ्यासारखं जगावं
मग कोणताच प्रश्न उरणार नाही
भावनारहीत दगड सागळे, कोणीच
सुख, दु:खाची वाटणी करणार नाही

पटलं मला त्याचं म्हणनं
वाटलं सर्वांनी असचं जिवन जगावं
दोन-चार सुखी जणांखातर
का हजारोनी दु:ख भोगावं

@सनिल पांगे

No comments: